जय ज्योती, जय क्रांती
"विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
असे सांगणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम
'शिवजयंती' सुरु करणारे, महान क्रांतिकारक, उत्कृष्ट
उद्योजक, सत्य शोधनाचे प्रणेते,शिवरायांवर पहिला
सर्वोत्तम पोवाडा लिहिणारे,
शिवशाहीर, "क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले"
यांची आज स्मृतिदिन ,,,ll
महात्मा फुलें यांच्या महान कार्याला मानाचा मुजरा
विनम्र अभिवाद
महात्मा ज्योतीराव फुले हे या देशातील एक महान
शिक्षणतज्ञ होते. प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे
व सार्वत्रिक झाले पाहिजे अशी मागणी १३० वर्षापूर्वी
देशात सर्वप्रथम करणारे थोर महात्मा होते. १८८२
साली ब्रिटीश सरकारने नेमलेल्या अखिल भारतीय
पातळीवरील हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी लेखी
स्वरूपात हि मागणी केली. देशात शिक्षणहक्क कायदा
२०१० पासून लागू करण्यात आला असुन त्यामुळे
देशभर शैक्षणिक पर्यावरण उभे राहत आहे.
ज्योतीराव व सावित्रीबाईंनी पुण्यात प्रथम
सर्व समाजातील मुलींसाठी आणि अस्पृश्य समजल्या
जाणाऱ्या जातींच्या मुलांसाठी शाळा सुरु केल्या.
त्यांनी दोन शिक्षणसंस्था स्थापन केल्या होत्या.
१) नेटीव्ह फिमेल स्कूल्स इन पुणे, २) दि सोसायटी
फॉर प्रमोटींग एज्युकेशन ऑफ महार मांग अँड अदर्स
या दोन संस्थांच्या वतीने त्यांनी मुली व मुले यांच्यासाठी
शिक्षणाचे दरवाजे उघडले. ते फक्त संस्थाचालक नसून
द्रष्टे शिक्षणतज्ञ होते. याचे पुरावे बिलेखागारात उपलब्ध
आहेत. १८४८ साली त्यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली
शाळा सुरु केली. नंतर अहिल्या आश्रमात अनुसूचित
जातीच्या मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले.
त्यांनी इयत्ता पहीपासुन शेतीचे व उद्योगाचे
शिक्षण दिले पाहिजे अशी मागणी केली होती.
(Industrial Department should be attached to
the schools in which children would learn
useful trdes and crafts and be able on leaving
school to maintain themselves comfortably and independently) त्रिभाषासुत्र स्वीकारून पहिलीपासून
इंग्रजी त्यांनी सुरु केले होते.
त्यांच्या शिक्षणविषयक कामाला प्रतिगामी विचारांच्या
मंडळींनी खूप विरोध केला तरीही जोतीराव व त्यांचे
सहकारी डगमगले नाहीत सामाजिक विरोधामुळे वडिलांनी ज्योतीरावांना घराबाहेर काढले. त्यांचे मित्र उस्मान शेख
यांच्या घरी राहून जोतीराव व सावित्रीबाईंनी आपले
शिक्षणाचे मिशन चालू ठेवले. त्यांचा ध्येयवाद आणि
त्यांची तळमळ अजोड होती. सावित्रीबाईंना फातिमा शेख,
गणू शिवाजी मांग व धुराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी
सहकार्य केले. या शैक्षणिक चळवळीत लहूजी वस्ताद साळवे
आणि रानबा महार, तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब
चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर,
भवाळकर, परांजपे आदी सहकारी सहभागी होते.
१८५५ साली त्यांनी राहत्या घरी देशातील पहिली
प्रौढ साक्षरता वर्ग सुरु केले. हि साक्षरता अभियानाची
सुरुवात होती. मुलामुलींच्या शैक्षणिक गळतीच्या मुळाशी
दारिद्र्य, पालकांची निरक्षरता, अंधश्रद्धा, शिक्षणापासून
काय लाभ व सुखे असतात याचा परिचय नसणे आदी
कारणे असल्याचे सांगून ती दूर करण्यासाठी त्यांनी उपाय
योजले. ते गरीब मुलामुलींना विद्यावेतन देत असत.
शिक्षणातून जीवनातील खरे-खोटे निवडण्याची क्षमता
आली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता.
"दि पूना ऑब्झर्व्हर अँड डेक्कन वीकली" या वृत्तपत्राने
त्यांचे काम म्हणजे भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील
एका नव्या युगाचा आरंभ होय असे वर्णन केले होते. या
कामात हे पती-पत्नी इतके व्यस्त असत की त्यांना अनेकदा
जेवायला हि फुरसत मिळत नसे. अशा शब्दात समकालीन
वृत्त पत्रांचे कौतुक केलेले आढळते. मुलींच्या शाळांच्या परीक्षा बघायला पुणा कॉलेजच्या प्रांगणात ३,००० हून अधिक लोक
जमले होते आणि त्याहून अधिक गर्दी बाहेर होती असे वर्णन
शिक्षण खात्याच्या अहवालात मिळते.
ज्योतीरावांनी शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांताला विरोध
केला आणि समाजातल्या तळागळापासून शिक्षणाची
सुरुवात केली पाहिजे याचा आग्रह धरला.
विधवांना त्या काळात पुनर्विवाहाची बंदी होती केशवपन
करावे लागत होते. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन विधवाविवाह
घडवून आणले आणि केशवपन करू नये यासाठी नाभिक
बांधवांचे प्रबोधन करून त्यांचा केशवपनविरोधी संप घडवून
आणला. विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी १८६३ साली त्यांनी स्वत:च्या घरात बालहत्या
प्रतिबंध गृह काढले.
ते पर्यायी संस्कृतीचे जनक होते. मानवी हक्कांसाठी ते
अहोरात्र झगडले. ज्योतीरावांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता
शिक्षण, जाती निर्मुलन, स्त्री पुरुष समानता, शेती व
शेतकरी यांचा संर्वागिण विकास, महिला, अनुसूचित जाती, आदिवासी, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय यांचे सामाजिक
संघटन, मानवी हक्कांसाठी जागृती आणि संघर्ष यांसाठी
अभूतपूर्व योगदान दिले.
स्वत:च्या घरातील पाण्याची विहीर त्यांनी दिन दलित
अस्पृश्य बांधवांसाठी खुली केली, सत्यशोधक विवाह
पद्धतीची सुरुवात करून हुंडा,लग्नातील डामडौल व अमाप
खर्च यांना प्रतिबंध केला, कमी खर्चातील आदर्श विवाह
घडवून आणले. या लग्नातील मंगलाष्टकांमध्ये स्त्रियांच्या
मानवी अधिकारासाठी झटण्याची शपथ नवरा मुलगा घेत
असल्याचे नमूद केले. १४० वर्षापूर्वी आपला गुलामगिरी
हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील निग्रोंच्या मुक्ती चळवळीला
अर्पण केला होता.
ज्योतीरावांनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात १८८३ साली
शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र
प्रकाशित केले. शेतीचे शिक्षण, संकरित बियाणे, अवजारे,
पिक पद्धती, शेतीला जोडधंदे, पाणी आडवा पाणी जिरवा या मोहीमेव्दारे पाणी पुरवठ्याचे नियोजन आधुनिक पद्धतीने
करण्यावर त्यांनी भर दिला शेतीमालाला उत्पादन खर्चावर
आधारित बाजारभाव मिळाले पाहिजेत याचा त्यांनी आग्रह
धरला.
पुणे विद्यापीठ आज ज्या राजभवनाच्या जागेवर उभे आहे. त्याठिकाणी पूर्वी केवळ माळरान होते. ब्रिटीश सरकारने
खापराच्या कौलातून पाणी पुरवले. पाणी मिळाले तर
शेतकरी काय जादू करू शकतो त्याचे उदाहरण म्हणून
या ठिकाणी फुललेल्या नंदनवनाचा महात्मा फुल्यांनी या
ग्रंथात आवर्जून उल्लेख केला आहे.
सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशाच्या खेड्या
पाड्यात शिक्षण, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मुलन, जाती
निर्मुलन, स्त्री पुरुष समानता धर्मचिकित्सा, संसाधनांचे
फेर वाटप, आंतरजातीय विवाह, लोकजागृती आणि प्रबोधन
यासाठी ते झटले. त्यांच्या प्रेरणेतून नारायण मेघाजी लोखंडे
यांनी १८८० साली मुंबईत पहिली कामगार संघटना स्थापन
करून भारतीय कामगार चळवळीचा पाया घातला.
महात्मा फुले हे पुणे नगरपालिकेचे १८७६ ते १८८२
या काळात आयुक्त (कमिशनर) होते. त्या काळात त्यांनी पुणे शहराच्या विकासासाठी फार मोठे योगदान दिले. त्यांनी पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅकटींग कंपनीचे कार्यकारी संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) म्हणून इमारत बांधणी, रस्ते, पूल, धरण, बोगदे उभारण्याचे काम केले. ग्रंथलेखन आणि प्रकाशन क्षेत्रात त्यांचे
फार मोठे योगदान आहे.
अशा थोर विचारवंत क्रांतिकारक क्रांती ज्योती महात्मा फुलें
यांच्या महान कार्याला मानाचा मुजरा
विनम्र अभिवाद
0 Comments