शैक्षणिक लेख
वाघिणीचे दुध दुर्मिळ होणार का.....?
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले. शिक्षणाबाबत त्यांचे उदात्तवादी धोरण होते "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही" अशी त्यांची शिकवण त्यांनी वंचित समाजाला दिली. आणि त्याप्रमाणे तळागाळातील समाजातील प्रत्येक घटकाला नागरिकाला शिक्षणाचे महत्व कळावे व प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान हक्क, समान संधी उपलब्ध करून देण्यात आली असुन यासाठी घटनेमध्ये 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी कायद्यात शैक्षणिक तरतूद करण्यात आली.
आज देशात कोरोणा महामारीने थैमान घातले असून सर्व जनतेला बंदिस्त करून ठेवले आहे.अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे, देश आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडला आहे. देशात फक्त प्रत्येक जीव वाचविण्याच्या दृष्टीने जनतेच्या हितासाठी, सुरक्षेसाठी अतोनात प्रयत्न सुरू आहे...
परंतु या सर्व घटनांकडे बघतांना एक महत्त्वाच्या विषयाकडे खुप मोठे दुर्लक्ष होत आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण ..... देशात आर्थिक मंदी आली ती पण काही कालावधीनंतर निघून जाईल, ठप्प झालेले व्यवसाय सुद्धा कालांतराने सुरळीत होतील.... परंतु चिमुकल्यांच्या शिक्षणाचे काय ................?
सन 19 - 20 मागिल वर्षी आठ महिने शाळा झाली पेपर न घेता निकाल जाहीर झाला हरकत नाही. शिक्षण हि क्रमवार चालणारी प्रक्रिया आहे. एका वर्गाची किमान अध्ययन क्षमता पुर्ण करून त्या वर्गाचा अभ्यासक्रम पुर्ण झाला तेंव्हाच तो विद्यार्थी पुढच्या वर्गात पात्र होतो. सन 20 - 21 या वर्षी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हे शाळा व शिक्षक न बघता पुढील वर्गात प्रवेशीत झाले. हि खूप गंभिर बाब आहे अहो अशिक्षीत पालकही या गोष्टीला मान्य करत नाही.... परंतू "कळते पण वळत नाही" अशी अवस्था पालकांची कोरोमुळे झाली आहे . सध्याच्या परिस्थितीत पालक वर्ग जरी हवालदिल झाला असेल, पण आपण सर्व बुद्धीजीवी वर्ग असेच हातावर हात देऊन बसलो तर मग या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार..? ..... शिक्षणाच्या बाबतीत अनेक शिक्षणतज्ञ आहे पण हे सुद्धा गप्प बसले आहे कुणीच काही बोलायला तयार नाही.... देशाच्या प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे शिक्षण आहे . कोरोणामुळे शिक्षणाची खुप गंभीर अवस्था झाली आहे. याचा गांभीर्याने विचार होतो का..? मग या देशातील भावी उज्वल भविष्याचे काय ..?
लोक आरक्षणासाठी रस्त्यावर यायला तयार आहे, व्यावसायिक व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आंदोलन करत आहेत. नेते निवडणूकीसाठी रस्त्यावर सभा घेत आहे.कर्मचारी पगारासाठी बंद पुकारत आहे. प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी सर्वकाही करत आहे. ....परंतु या देशातील भावी पिढीला शिक्षण कसे मिळेल यासाठी कुणीच पुढे येत नाही काय होणार या चिमुकल्यांच्या भविष्याचं. ....?
"अशक्त मस्तकाला सशक्त करण्याचे काम फक्त शिक्षणच करू शकते" , जर शिक्षणच दुबळे झाले तर मग चिमुकल्यांचं भविष्य कुपोषितच राहणार यात काय शंका.... सकारात्मक निर्णय घेणारी व्यक्ती अचानक उद्भवलेल्या अडचणींवर योजना बनवण्यात कधीच संकोच करत नाही.तो सर्व परिणामांसाठी तयार असतो, तर दुसरीकडे नकारात्मक निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत व्यक्ती कुठलीही पर्यायी योजना तयार ठेवत नाही. म्हणून सकारात्मक विचारच आपणास तारू शकता...
आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कायदा, सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन व पोलिस ज्याप्रमाणे आपले काम चोखपणे बजावत आहे तसेच आरोग्य विभागातील प्रशासन, तज्ञ डॉ, परिचारिका, सेवक जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने सुद्धा आपली भुमिका सिद्ध करण्याची हि खरी वेळ आहे. आपल्याला या परिस्थितीवर मात करायची असेल तर चिंता, निराशा किंवा भितीमुळे पांगळे होण्याची ही वेळ नाही मग यासाठी शिक्षण विभाग, शिक्षण तज्ञ, राज्य शैक्षणिक संशोधन म़डळ, शिक्षक यांनी समोर आल पाहिजे विद्यार्थी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी नवनविन उपक्रम व उपाययोजना संकल्पना आखल्या पाहिजेत. कोरोना परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शासनाने आँनलाईन शिक्षण व आँनलाईन स्वाध्याय उपक्रम राबविला आहे परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अपुऱ्या मोबाईल व सोई सुविधेच्या कमतरते अभावी हा उपक्रम फारसा प्रभावी वाटत नाही.
विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात टिकून राहील यासाठी सोप्या व सहज रित्या विद्यार्थ्यांना कृतीतून स्वयंअध्यन करण्यास प्रवृत्त करणारी आनंदायी पद्धतीने स्वाध्याय पुस्तिका तयार करता येतील, किंवा शिक्षकांच्या अध्यापनाचे व्हिडिओ तयार करून पेनड्राईव घ्या माध्यमातून गटागटाने विद्यार्थ्यांना घरोघरी पोहचविता येतील.मोबाईल टिचर या संकल्पनेनुसार छोट्या छोट्या गटात अध्यापण करता येईल. तसेच सध्या विद्यार्थी घरीच जास्त वेळ असल्यामुळे कृती युक्त शिक्षण पद्धतीवर जास्त भर देऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येईल. मग यात विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग, कार्यानुभव साहीत्य तयार करणे ,मातिचे भांडे , हस्तकला, चित्रकला, लेखनात भर पाडण्यासाठी थोर पुरुषांची कथा लेखन, अशी अनेक छोटे छोटे उपक्रम करण्याची मार्गदर्शक पुस्तिका, तयार करता येतील. याप्रमाणे शिक्षण तज्ञांच्या सल्ल्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे.
कोरोना परिस्थितीतही तळागाळातील ग्रामीण भागातील गरिब ,वंचित,मजुर, शेतकरी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागावर खुप मोठी जबाबदारी आहे व ती परिपुर्ण होण्यासाठी मोठे पाऊल उचलने गरजेचे आहे. सध्याची कोरोना परिस्थिती बघता पुढील एक वर्ष पूर्ण असेच राहीले तर प्राथमिक शिक्षण हे धोक्यात येईल. ग्रामीण भागातील गरिब वंचित घटकातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहील.आज शाळेत हजेरीवर विद्यार्थी नाव नोंदणी जरी झाली असेल तरी तो शाळेत शिक्षण मिळत नसल्याने शाळाबाह्यच आहे. खर तर मध्यंतरी कोरोना काळातही अनेक कृतीशील सर्जनशील शिक्षकांनी मंदिरातील शाळा, घरोघरी स्वाध्याय पेपर, घरपोच शाळा, निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली शाळा भरवून ग्रामीण भागातील गरिब वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी स्वयंप्रेरणेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशाच सर्जनशील शिक्षकांच्या मदतीने कोरोना काळातही विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
परिस्थिती कठीण असेल तेंव्हा निराश न होता स्वतःच समस्या निर्माण करण्यास सुरुवात करू नये, त्याऐवजी आपण जागृत होऊन उपायाचा एक भाग म्हणून स्वतःला समर्पित केले पाहिजे. "शिक्षक जेंव्हा ज्ञानाच्या रंगात रंगतो तेवढाच तो कर्माच्या रंगातही शोभून दिसतो". तुमची सर्जनशीलता ही भावी पिढीला नवीन विचार व्यक्त करण्यास भाग पाडते.
सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाची भुमिका हि आता शिक्षकांची आहे. शिक्षक हा शिक्षणाचा महत्वाचा कणा आहे. ज्याप्रमाणे कोरोना काळातही डॉ, परिचारिका ह्या दवाखान्यात प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहे. त्याचप्रमाणे एक सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन आपल्या ज्या चिमुकल्यांच्या समोर आपण आदर्श आहोत त्या शाळेतील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.पगारापुरते नव्हे तर त्यापलीकडे जाऊन माणूसकीच्या नात्याने ध्येयवेडे होऊन आपल्या शाळेतील चिमुकल्यांना आवश्यक शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज आपल्याला शिक्षणाचे दोन प्रकार बघायला दिसते एक म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षण व दुसरे शहरी भागातील शिक्षण. शहरी भागातील पालक सुशिक्षित व सतर्क असतात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते त्यामुळे ते आपल्या पाल्याला उत्कृष्ट सोयी सुविधा उपलब्ध करून शिक्षण देण्यासाठी समर्थ असतात. त्याउलट ग्रामीण भागातील पालकांच्या नसिबी अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक परिस्थितीने ग्रासलेले त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करू शकत नाही. आणि ग्रामीण भागातील पालक आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे जास्त लक्ष देत नाही कारण बहुतेक पालक हे मजुर व शेतकरी प्रवर्गात मोडतात त्यांच्या दैनंदिन कामामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नाही. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षक हाच एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानल्या जाते.
एक वर्षे झाले विद्यार्थी अध्ययनासाठी शाळेत आलेच नाहीत आता तर काही विद्यार्थी शाळा ही संकल्पना विसरता की काय अशी भिती निर्माण झाली आहे. कारण सुरळीत शाळा असतांनाच सुद्धा घरचे सर्व कामे करून शाळा करणारी काही विद्यार्थी असतात त्यांचा ओढा हा घरगुती कामात व हंगाम असला की शेतातील कामात जास्त असतो. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत अश्या विद्यार्थ्यांची तर आता शाळा ही संकल्पनाच नष्ट होते की काय हि खूप मोठी समस्या आहे.
खर तर आज भारतातील शैक्षणिक शिक्षण तत्वज्ञानी यांची ध्येय उद्दिष्ट आठवतात जसे की
रविंद्रनाथ टागोर :- वसुधैव कुटुंबकम् भावनेत निसर्गवाद व कार्यवादाला महत्व दिले..
स्वामी विवेकानंद :- माणूस घडविणे, उच्च दर्जाची राष्ट्रभक्ती निर्माण करणे, दरिद्रीनारायणापर्यंत शिक्षणप्रसार करणे...
छत्रपती शाहू महाराज यांचा मागासवर्गीयांबाबतचा उदात्त शैक्षणिक दृष्टीकोन,
राष्ट्रपिता महात्मा गांधी :- स्वावलंबन व स्वयंपूर्णता, चारित्र्य संवर्धन धार्मिक सहिष्णुता, श्रमप्रतिष्ठा निर्माण करणे. मुलोद्योगी शिक्षण स्विकारणे,
महात्मा फुले :- वंचितांचे व स्रि शिक्षणाचे महामेरू,
सावित्रीबाई फुले :- प्लेग सारख्या साथीच्या रोगांवर मात करत स्त्रियांना जगण्याचा अधिकार देऊन महीलांच्या शिक्षणासाठी तळमळ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर :- तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार कायद्याने प्राप्त करत अठरा अठरा तास अभ्यास करत विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठरणारे शिका संघटित व्हा असा मोलाचा संदेश देणाऱ्या महामानवाला व ज्ञानाचे महत्व ओळखून शिक्षणासाठी दिलेल्या महान योगदान व शिक्षणासाठी राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीसाठी केलेल्या उपाययोजना व थोर महात्म्यांच्या विचारांना उजाळा देत चिंतन व मनन करण्याची हि खरी वेळ आली आहे.
रोगी माणसाला तर आपण दवाखान्यात नेऊन उपचार करून ठिक करू शकतो. उपाशीपोटी असणाऱ्यांना अन्नधान्य देउन समाधानी करू शकतो. बेरोजगाराला रोजगार देऊन जिवन जगण्याची संधी देऊ शकतो. व्यवसायातील तोटा कालांतरानं भरून काढु शकतो. परंतू शेक्षणिक क्षेत्रातील चिमुकल्यांची पिढी जर शिक्षणाने कुपोषित झाली तर त्यांना सशक्त करण्यासाठी कोणतेही औषध उपयोगी पडणार नाही. अज्ञानाची हि खोल दरी जर वाढत गेली तर परत कधीच भरून काढता येणार नाही हे आपण गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. सध्या कोरोना परिस्थिती वाईट आहे परंतु "संघर्ष आणि उलथापालथी शिवाय जीवन अगदी निरस होऊन जाईल म्हणून या गोष्टींना घाबरून जाऊन स्वतःच्या सर्जनशील विचारांची आहुती देऊ नका". कारण शिक्षकाचे विचार व कृती ही अमुल्य आहे, ती अतुल्य भारत निर्माण करण्यासाठी आहे हे विसरून चालणार नाही. लक्षात ठेवा सकारात्मक व आशावादी व्यक्ती योग्य आणि दुरगामी परिणामाचे निर्णय घेतात. "उत्कृष्ट कार्य करण्यासाठी मानसाची आर्थिक स्थिती महत्वाची नसते तर त्याची मानसिक स्थिती महत्वाची असते" सध्या सकारात्मक मानसिकतेची गरज आहे. या परिस्थितीत आपण आपल्या शाळेतील चिमुकल्यांना काय देतो याचा अंदाज आपल्या मानसिकतेतून व विचारावरून सिध्द होते.
सध्या तरी या कोरोना परिस्थितीचा व भविष्यातील स्थितीचा विचार करता शिक्षण प्रशासन व शिक्षक यांनी आतापासूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल व अशा विदारक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या पुर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीने गरिबी वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल व त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना नियोजन करण्याची पुर्वतयारी करणे गरजेचे आहे , नाही तर ग्रामीण भागातील पालकांना केविलवाण्यासारखे "वाघिणीचे दुध दुर्मिळ होणार का"...? असा विचार व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही.
अनिल चव्हाण
राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी ता मोताळा जिल्हा बुलढाणा
9767866933,,7796228888
0 Comments